वीज, इंधन जीएसटीत आणावे

उद्योजकांच्या संघटनांची केंद्र सरकारला सूचना

नवी दिल्ली – जीएसटी कर सुधारणेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची गरज आहे, असे फिक्की या संघटनेचे अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी म्हटले आहे.

तर सीसीआयने म्हटले आहे की, आता जीएसटीचा दुसरा टप्पा सुरू करण्याची वेळ आहे. वीज, तेल आणि वायू, स्थावर मालमत्ता आणि अल्कोहोल कर प्रणालीच्या व्याप्तीत आणणे आणि कर दराच्या श्रेणी मर्यादित करून कर सुधारणेसाठी जीएसटीचा दुसरा टप्पा सुरू करावा. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीची पुढची पायरी गाठू शकते, असे सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी म्हटले आहे.

राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे गैरसमज निर्माण झाला आहे. सरकारला पूर्वीच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या धर्तीवर एक स्वतंत्र उच्चस्तरीय केंद्रीय संस्था स्थापन करण्याचा विचार करावा, असे फिक्कीने म्हटले आहे.

सीआयआयचे माजी अध्यक्ष आदि गोदरेज यांनी म्हटले की, दोन वर्षात जीएसटी प्रणाली मजबूत झाली असून निष्कर्षही चांगले आहेत. सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले की, भारतीय उद्योग जगताने अधिक लवचिकता दाखविली आहे. जीएसटी यशस्वीपणे लागू करण्याच्यासाठी मदत केली आहे.

दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराला (जीएसटी) आता सर्वत्र मान्यता मिळालेली आहे. आता या कराची वसुली दरमहा 1 लाख कोटी रुपयांहून अधिक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.