नवी दिल्ली – महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना त्यांच्यावरील आरोपांबाबत येत्या 72 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश मंत्रालयाने दिले होते. त्यामुळेच ब्रिजभूषण सिंह हे आज दुपारी चार वाजता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील नवाबगंज येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषद घेणार आहेत.
दरम्यान, त्यापूर्वी ब्रिजभूषण सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी अमित शाह आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यात तब्बल आठ मिनिटे चर्चा झाली आहे. यावेळी त्यांनी कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अमित शाह यांना ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टीकरण दिल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत आपल्याविरोधातील कटाचा पर्दाफाश करणार असल्याचे ट्विट ब्रिजभूषण यांनी केले आहे. दिल्ली ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय पदक विजेते कुस्तीपटू जंतरमंतरवर बसले असून ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी या खेळाडूंनी केली आहे.
सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले. त्यांचे महिला खेळाडूंशी असलेले वर्तनही अत्यंत असभ्य आहे. ते सतत महिला खेळाडूंनाच लक्ष्य करत त्रासही देतात. त्यांनी महिला खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षक दिले नाहीत तसेच मोठ्या स्पर्धांच्या कालावधीतही आमच्या संघासाठी फिजीओ किंवा प्रशिक्षक नसतो, असे आरोप महिला कुस्तीपटू विनेश फोगटसह ऑलिम्पिक व राष्ट्रकुल स्पर्धा पदक विजेत्या अनेक महिला कुस्तीपटूंनी सिंह यांच्यावर केले आहेत.