नवी दिल्ली – पैलवानांच्या आरोपांमुळे खासदार ब्रिजभूषण प्रचंड अडचणीत आले असताना आता त्यांनी सहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीसाठी केलेल्या कथित चमत्काराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मागच्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या आणि कॉंग्रेसचे सरकार स्थापन होणार असे वातावरण असतानाच अचानक भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी बोलणीसाठी ब्रिजभूषण यांना गोव्यात पाठवण्यात आले होते असा या बातम्यांचा सार आहे. काही संकेस्थळांवर हा दावा करण्यात आला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाला जीएफपीला आपल्यासोबत घेण्यासाठी अंतिम टप्प्यातील चर्चा करण्याकरता ब्रिजभूषण यांना भाजपने पाचारण केले होते असा दावा केला जातो आहे. मात्र भाजपच्या गोवा प्रदेशाध्यक्षांनी त्याचा इन्कार केला आहे. सरकार स्थापनेतील ब्रिजभूषण यांच्या कथित भूमिकेबद्दल आपल्याला कोणती कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र जीएफपीचे विजय सरदेसाई यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवेळी ब्रिजभूषण यांची गोवा यात्रा झाली होती, याला दुजोरा दिला आहे.
मात्र 2017 मध्ये आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो कारण त्यावेळी मनोहर पर्रिकर यांनाच राज्याचे मुख्यमंत्री करण्याबाबत सहमती झाली होती. पर्रिकर तेंव्हा संरक्षण मंत्री होते. ब्रिजभूषण तेंव्हा आले होते. त्यावेळी आम्ही पत्र दिले होते आणि पर्रिकर मुख्यमंत्री असतील असेही पत्रात म्हटले होते. 2017 मध्ये जीएफपी सरकारमध्ये सहभागी झाली. मात्र 2019 हा पक्ष पुन्हा बाहेर पडला.
दरम्यान, ब्रिजभूषण आणि गोवा कनेक्शनचा हा जो नवा दावा केला गेला आहे त्याबाबत संबंधित माध्यमाने ब्रिजभूषण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जो होऊ शकला नाही.