जाणून घ्या निसर्गसंस्थेचे कार्य : बीएनएचएस

डॉ. सालीम अली यांनीही वाढवला आहे या संस्थेचा लौकीक

प्राणीविज्ञानविषयक टिप्पणांचा व निरीक्षणांचा जिज्ञासूंमध्ये विनिमय व्हावा आणि प्राणीजीवनाच्या विविध लक्षवेधक नमुन्यांचे प्रदर्शन मांडावे, या हेतूने मूलत: ही संस्था मुंबईत इ. स. १८८३मध्ये स्थापन करण्यात आली. सुरुवातीस या खासगी संस्थेत फक्त सात सभासद होते व त्यांनीच १८८६मध्ये एक नियतकालिक काढले आणि ते ‘जर्नल ऑफ द बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ या नावाने आजपर्यंत सुरू आहे. डॉ. सालीम अली यांनीही वाढवला आहे या संस्थेचा लौकीक.

संस्थेचे नियतकालिक वर्षातून तीन वेळा निघते. यात पौर्वात्य प्रदेशातील प्राणी व वनस्पती यावर लेख असतात. आतापर्यंत फुलपाखरे, बदके, साप, कीटक, तालवृक्ष (पाम), वाळवंटी वनस्पती, औषधी व विषारी वनस्पती, ऑर्किड्स वगैरे विविध विषयांवर आधारलेले तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. याखेरीज संस्थेने काही ग्रंथही प्रसिद्ध केले आहेत. भारतातील पक्षी, शिकारी पक्षी, भारतातील पशू, वेली व झुडपे, फुलपाखरे, मॉलस्का (मृदुकाय) प्राणी वगैरे या ग्रंथाचे विषय आहेत. लहान मुलांकरिता संस्थेने विविध विषयांवर (उदा. भारतातील पक्षी, सुंदर वनस्पती, मॉन्सून वनस्पती इत्यादी) व निरनिराळ्या भारतीय भाषांत पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या आहेत.

गेली कित्येक वर्षे या संस्थेकडे प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नमुने त्यांची ओळख पटविण्याकरिता पाठविले जात आहेत, ते जतन करण्याकरिता संस्थेच्या हवाली केले जातात. संस्थेच्या संग्रही असे भारतातील २०,००० सस्तन प्राण्यांचे नमुने आहेत. यात कित्येक दुर्मीळ प्राण्यांची कातडी आहेत. पक्ष्यांच्या संग्रहात २३,००० पक्षी आहेत. यात माळढोकसारखे दुर्मीळ पक्षीही आहेत. यांखेरीज १,५०० माशांच्या जाती, ४,००० सरीसृप (सरपटणारे) प्राणी, १,००० उभयचर (पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणारे), ८०,००० कीटक व अनेक अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेले) प्राणी यांचे नमुने संस्थेच्या संग्रहालयात आहेत. हा संग्रह सर्वसामान्य जनतेस पाहण्यास खुला नाही, पण या विषयातील तज्ज्ञ व संशोधक यांना अभ्यासाकरिता तो उपलब्ध आहे.

मुंबई सरकार व प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम यांच्या सहकार्याने १९२३ साली या संग्रहालयात एक प्रकृतिविज्ञान (नॅचरल हिस्टरी) विभाग उघडण्यात आला. याची देखभाल बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सहकार्याने करण्यात आली. सर्व प्राण्यांचे प्रदर्शन कलात्मक रीतीने त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीस जुळेल, असे करण्यात आले. हे प्रदर्शन जनतेस खुले करण्यात आले आहे.

संशोधन क्षेत्रातही संस्था क्रियाशील आहे. संस्थेने ब-याच निरीक्षण मोहिमा काढल्या व त्यांत १९११-२३ या काळात सस्तन प्राण्यांची पाहणी करण्याकरिता काढलेली मोहीम महत्त्वाची होती. या मोहिमेत जमा केलेल्या सस्तन प्राण्यांच्या नमुन्यांवर बरेच संशोधनात्मक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. पूर्व घाटातील पक्ष्यांची पाहणी करण्याची मोहीम १९२९ साली हाती घेण्यात आली व आता सर्व देशभर ती सतत चालूच आहे. या मोहिमेत भारत, सिक्किम, भूतान, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार बेटे या प्रदेशांतील पक्ष्यांचे नमुने गोळा करण्यात आले.

वन्यपशूंचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या क्षेत्रातही ही संस्था सरकारशी सहकार्य करते. संस्थेचे कार्यकर्ते शाळा-महाविद्यालयांस भेटी देऊन विद्यार्थ्यांत निसर्गाची आवड निर्माण करण्याकरिता व्याख्याने देतात. तसेच काही होतकरू विद्यार्थ्यांना अनुदान अगर शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. संस्थेचे ६,००० ग्रंथ असलेले ग्रंथालय असून, त्यात प्राणिविज्ञान, वनस्पतीविज्ञान व त्यांच्याशी संबंधित अशा विविध विषयांची पुस्तके आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.