अवकाळी पावसामुळे वीटभट्‌टी व्यावसायिक संकटात

  • वीटभट्‌टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्च्या विटा “पाण्यात’

इंदोरी – गेल्या दोन दिवसांपासून मावळात ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी (दि. 19) दुपारी विजेच्या लखलखाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. अवेळी पावसामुळे तालुक्‍यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी कामावर गेलेल्या अनेकांची व शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची मोठी तांरबळ उडाली. सोबत रेनकोट छत्री नसल्याने अनेकांना भिजतच घर गाठावे लागले आहे.

वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, यासाठी महावितरणकडून अनेक ठिकाणी काहीकाळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र ऐनहिवाळ्यात मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी मात्र हवानदिल झाला आहे. तसेच पूर्व मावळ परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.आम्ही वेळोवेळी महसूल कर भरतो; परंतु आजपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई असे काही भेटले नाही; या अवकाळी पावसामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा झाला आहे.
– सखाराम काशीद, वीटभट्‌टी व्यावसायिक.

अवकाळी पावसामुळे मावळ परिसरात वीटभट्‌टी व्यवसायकांचे नुकसान झाले असले तरी वीटभट्‌टी व्यासायिकांना यावर कोणत्याही प्रकारची मदत शासनातर्फे होऊ शकत नाही. शेती, जनावरे आदी नुकसानग्रस्त ना शासकीय मदत देण्याच्या तरतुदी आहेत.
– मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.