लाचखोर पशुवैद्यकीय अधिकारी “लाचलुचपत’च्या जाळ्यात

दोन हजाराची लाच घेताना पकडले

सातारा –
शासनाच्या योजनेतून मंजूर झालेल्या कुक्‍कुटपालन प्रकल्पाच्या पोल्ट्री शेडच्या अनुदानाची फाईल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बरड (ता. फलटण) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. दिलीप महादेव नाझरीकर (मूळ रा. खटके वस्ती, गोखळी, सध्या रा. टीसी कॉलेजमागे, बारामती) असे अटक केलेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. बरड येथील जनावरांच्या सरकारी दवाखान्यामध्ये शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, बरड परिसरातील एका शेतकऱ्याच्या आईच्या नावाने असलेल्या पोल्ट्री फार्मला शासनाच्या योजनेतून मंजूर झालेल्या शेडच्या अनुदानाची फाईल मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी नाझरीकर याने अडीच हजारांची लाच मागितली होती. तक्रारदार व नाझरीकर यांच्यात झालेल्या तडजोडीअंती नाझरीकरने दोन हजार रुपये घेण्यास सहमती दिली. त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून

शुक्रवारी बरड येथील जनावरांच्या सरकारी दवाखान्यात सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाझरीकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नाझरीकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के तपास करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे येथील पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय अडसूळ, प्रशांत ताटे, संभाजी काकटर, विशाल खरात, तुषार भोसले यांनी ही कारवाई केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)