सोक्षमोक्ष : लाचखोरांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे!

-जयेश राणे

लाच घेणे व लाच देणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही आपले काम लवकर व्हावे यासाठी लाच देणारे अनेक हात असल्याने लाच घेण्याच्या प्रवृत्तीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रोज लाच घेतल्या प्रकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचनात येतात. यावरून लाचखोरी किती फोफावली आहे हे लक्षात येते. वरिष्ठ पदापासून कनिष्ठ पदापर्यंत लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

लाचखोरी हा एक कलंक आहे. एखाद्याच्या नावासह लाचखोर असे संबोधले जाणे लज्जास्पद आहे. मात्र, जे इतरांना त्रास होईल असे कृत्य करतात ते नेहमीच बिनधास्त असतात. त्यांना कसलेच भय वाटत नसते. उलटपक्षी आपल्याला कोण अडवणार? अशी एक प्रकारची मग्रुरी त्यांच्यात असते आणि त्या बळावरच ते इतरांना त्रास होईल अशा कृती करत असतात. किंबहुना तसे करण्याची सवयच अंगवळणी पडल्याने त्यातच त्यांना चांगले, समाधानी वाटत असते. मेहनत करून कमाई करण्यापेक्षा शॉर्टकट घेऊन कमाई करण्यात त्यांना पुष्कळ समाधान वाटत असते. अगदी आकाशालाच हात टेकल्याचा त्यांना आनंद होत असतो, असेही म्हणण्यास वाव मिळतो.

दुसऱ्याच्या तोंडचा घास सक्‍तीने खेचून घेऊन मिळवलेली संपत्ती कधीच टिकत नसते. याचा अनुभव लाचखोर मंडळींना येत असतो. तेव्हा मात्र “तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे’, असा अनुभव त्यांना येत असतो. लोकांकडून लुबाडलेल्या संपत्तीच्या बळावर जमीन, बंगले, सदनिका, सोने आदी गोष्टींची खरेदी करून त्यांचा संचय करण्यात आलेला असतो. मात्र कधीतरी अशी एक वेळ येते की, एका क्षणात होत्याचे नव्हते होते आणि प्रसंगी तुरुंगवासही भोगावा लागतो आणि लाचखोर म्हणून लोकांचा शिक्‍का बसतो. या बसलेल्या शिक्‍क्‍याविषयी अशांना किती खंत वाटते? हा प्रश्‍नच आहे.

लाचखोरीची जी प्रकरणे उघडकीस येतात त्यावरून अंदाज येतोच की हा प्रकार किती तळागाळापर्यंत पोहोचला आहे. लाच देणारा आणि घेणारा हे दोघेही अयोग्यच कृती करत असतात. आपली कामे झटपट करून घेण्यासाठी लाच देणारे आहेत म्हणून लाच घेणारेही आहेत. लाचखोरांना लाच द्यायचीच नाही, असे लोकांनीच एक जुटीने ठरवले, तर ही मंडळी सुतासारखी सरळ होतील. शासकीय वेतन, भत्ते आदी असूनही लाच मागणाऱ्यांना मनाकडेही काही वाटत नसते. पैसे कमवणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले जात असते.

सरकारी कार्यालयातून पकडलेल्या लाचखोरांची जनतेला ओळख व्हावी. यासाठी त्या कर्तव्यचुकार मंडळींची नावे ज्या कार्यालयात ते कार्यरत असतात त्याच ठिकाणी फलकावर लागली पाहिजेत. म्हणजे असे की, कार्यालयाच्या दर्शनी भागात जिथे लोकांचे लक्ष सतत जात असते त्या ठिकाणी त्या व्यक्‍तीचे छायाचित्र, पद, कोणत्या प्रकरणात लाच घेतली आदी माहितीचा तपशील सर्वांना वाचता येईल अशा प्रकारे ठळकपणे लागला पाहिजे. “मनाची नाही निदान जनाची तरी लाज वाटेल’ असे एक वाटते.

कायदेशीर प्रक्रियेत पुष्कळ वेळ जात असतो. त्यामुळे हा मार्ग उपयुक्‍त वाटतो. याविषयी सरकारने विचार करावा. कारण मुळातच त्या व्यक्‍तीला लाच घेताना रंगेहाथ पकडलेले असते. त्यामुळे त्या लाचखोर कर्मचारी, अधिकारी यांवर ठोस कारवाई होईपर्यंत आणि झाल्यावरही तो सविस्तर तपशील त्याच कार्यालयात ठेवणे आवश्‍यक आहे. शाळा-महाविद्यालयांतील फलकावर बोर्ड, विद्यापीठ यांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे लावलेली, लिहिलेली असतात. त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले ते नेत्रदीपक यश असते. म्हणून त्यांची नावे दर्शनी भागात असतात. लाचखोरांच्या विषयी म्हणायचे, तर त्यांनी नाव धुळीस मिळवलेले असते. त्यामुळे इतरांना त्रास झालेला असतो.

लाचखोरीत शिक्षा झालेले 22 जण, लाच घेताना पकडलेले 185 जण अद्यापही कामावर असल्याची माहिती समोर आली आहे. सोयीस्करपणे लाचखोर अधिकाऱ्याचे निलंबन टाळले जाते, कोर्टात आरोपपत्र दाखल करतानाही संबंधित विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची संमती आवश्‍यक असते; पण, त्यालाही मंजुरी मिळण्यात अडचणी, अपुरे मनुष्यबळ व कामाचा ताण ही कारणे देऊन बहुतांश वेळा निलंबन टाळले जाते. लाचखोरांची हकालपट्टी करताना दिरंगाई होता कामा नये. असे करणे म्हणजे एक प्रकारे त्यांना कुरवाळणेच असे का म्हणू नये? चुकीची कृती करताना “मी हे अयोग्य करत आहे’, असे त्यांना वाटत नाही, असे असताना लाचखोरांना अभय का द्यावे? शिक्षा ही शिक्षाच असते. त्यामुळे संबंधिताला ती भोगण्यासाठी पाठवलेच पाहिजे. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा’, असे एक वाक्‍य आहे.

शिक्षा भोगण्यास एक प्रकारे आडकाठी निर्माण केली जात असल्याने लाचखोर बिनधास्त आहेत, असे म्हणण्यास वाव आहे. येथे लाचखोरांवर पुढील कारवाई होण्यासाठी कशाप्रकारे चालढकलपणा होतो हे लक्षात येत आहे. असा प्रकार म्हणजे कामाची गती किती कुर्म आहे? याकडे लक्षवेध करतो. अमुक कर्मचारी, अधिकारी लाचखोर आहे, हे कळल्यावर त्याला शिक्षा होण्यासाठी धडपड करणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, येथे तर उलटेच चित्र आहे. हे चित्र बदल्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय लाच घेण व देणे दोन्हीही थांबणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.