गंगाखेड – अॅट्रोसिटीचा अर्ज मागे घेण्यासाठी आणि कॅंटीन चालवू देण्यासाठी 1 लाख रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीने मोठी कारवाई केली आहे. महिला पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. लाच घेतल्यानंतर कर्मचारी लाचेची रक्कम घेऊन पसार झाला असून महिला सहाय्यक निरीक्षक देखील पसार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक माधुरी महादेवराव मुंढे (वय 32, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), पोलीस हवालदार संजय त्र्यंबक भेंडेकर (वय 53, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), पोलीस शिपाई प्रेमदास दयाराम पवार (वय 37, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ) अशी लाच प्रकरणातील तीघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 45 वर्षीय तक्रारदार यांचे विरूद्धच्या अॅट्रोसिटी अर्जामध्ये मदत करून अर्जदाराला अर्ज मागे घेऊन गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यांची रेल्वे स्टेशन गंगाखेड येथील कॅंटीन चालवू देण्यासाठी आरोपींनी 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यावेळी तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपतप्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा पोलिस हवालदार संजय याला 1 लाख रूपयांची लाच घेताना पथकाने पकडले. तर रात्रीची वेळ असल्याने महिला सहाय्यक निरीक्षक यांना पकडण्यात आले नाही. यानंतर त्या पसार झाल्या असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तर पोलिस शिपाई प्रेमदास याला अटक केली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उप अधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल कडू, पोलीस हवालदार जमील जहागीरदार, पोलीस नाईक अनिल कटारे, पोलीस कर्मचारी अनिरूद्ध कुलकर्णी, शेख मुखीद, सचिन धबडगे, माणिक चट्टे, सारिका टेहरे, सावित्री दंडवते, रमेश चौधरी, जनार्धन कदम यांच्या पथकाने केली.