वडगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयात कारवाई
पुणे – भाडेपट्टा कराराची 7/12 वर नोंदणी करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना वडगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडले.
पंकज पवार (वय 31, रा.चरवड वस्ती, सिंहगड रोड) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे भाडेपट्टा कराराची 7/12 उतारावर नोंद घेणे आणि फेरफार काढण्याचे काम तलाठी कार्यालयात होते. ते करण्यासाठी तेथील खासगी व्यक्ती पंकज पवार याने 20 हजार रुपये मागितले होते. त्याची तक्रार एसीबीला मिळाली. पडताळणी करताना पवार याने तडजोडीअंती 15 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 15 हजार रुपये स्वीकारताना पंकज पवार याला पकडण्यात आले सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी येथील लाचखोर पोलीस जाळ्यात
तर, निगडी येथे पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चायनीज गाडी सुरु करण्याची आणि त्यावर कारवाई करू नये, यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने विभागाने सापळा रचून पोलीस शिपायाला पकडले. प्रवीण मुळूक (वय 36, रा. पिंपरी चिंचवड) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांना निगडी प्राधिकरणात चायनीज खाद्य पदार्थाची गाडी सुरू करण्याची होती. त्यासाठी मुळूक याने 5 हजार रुपयांची मागणी केली. त्याची तक्रार एसीबीकडे मिळाली. तिची पडताळणी केली असता तडजोडीनंतर 3 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच घेताना मुळूक याला पकडले. निगडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.