लोणंद – लोणंद शहरात, विशेषत: प्रभाग दहामध्ये सुरू असलेल्या कोट्यावधींच्या विकासकामांमुळे कार्यक्षम नगरसेवक अशी प्रतिमा निर्माण झाल्याने राजकीय आकसापोटी आपल्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत.
केवळ पदासाठी आणि स्वार्थासाठी आपल्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. मात्र, शहरातील जनता आपल्या पाठीशी असून पदासाठी नव्हे तर जनतेसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष किरण पवार यांनी दिली.
उपनगराध्यक्ष किरण यांच्यावर आरोप करून बारा नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्याबाबत किरण पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून पदाच्या हव्यासापोटी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. आरोग्य समितीचा सभापती म्हणून जबाबदारी पार पाडताना याच मंडळींनी माझ्या कामात अडथळे आणले.
कचरा डेपोसाठी काही जागांना स्वार्थापोटी विरोध करण्यात आल्याने हा सुटला नाही. नगरपंचायतीत मी नेहमीच उपस्थित असताना केवळ करायचा म्हणून आरोप केला जात आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करत असताना, मी एखादी राजकीय बाब ऐकली नाही, म्हणून मनमानी कारभाराचा आरोप केला जात आहे; परंतु लोणंदची सूज्ञ जनता सर्व ओळखून आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. या अविश्वास ठरावाला सहकारी नगरसेवकांच्या साथीने व जनतेच्या पाठिंब्यावर सामोरा जाणार आहे. पाण्याच्या टाकीखालचा कचरा उचलण्याचे टेंडर मी रद्द केले नाही. टेंडरमध्ये वाहन नमूद नसतानाही ठेकेदार 500 रुपयांत ट्रिप करण्यास तयार असेल तर ही निविदा मंजूर करावी अन्यथा फेरनिविदा काढावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याने ठराव रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही.