खराबवाडी ग्रामपंचायत कार्यकारिणी हाजीर हो!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आदेश : तत्कालीन ग्रामविकास अधिकारी लाच स्वीकारणे प्रकरण

महाळुंगे इंगळे – आठ “अ’च्या उताऱ्यावर बांधकामाच्या नोंदी करण्याकरता लाच स्वीकारताना खराबवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बाळू मलघे यास रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यामागचा नेमका सूत्रधार कोण, व अन्य काय प्रकार आहे का, याबाबतची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, कार्यकारिणीला जबाबदार धरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तातडीने हजर राहण्याचे आदेश दिल्यामुळे पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे.

आठ “अ’च्या उताऱ्यावर बांधकामाची नोंद करून घेण्यासाठी एक शेतकरी या ग्रामपंचायतीमध्ये गेले होते. त्यावेळी बाळू मलघे या ग्रामविकास अधिकाऱ्याने या कामासाठी संबंधित व्यक्‍तीने 20 हजार रुपयांची लाच मागितली. या तडजोडीमध्ये सोळा हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, संबंधिताने थेट पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती.

त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता मलघेने 16 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दि. 19 ऑक्‍टोबर 2016 रोजी खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित विभागाने सापळा लावून बाळू मलघेला वृद्ध शेतकऱ्याकडून 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, यामागची सत्यता पडताळून पाहणे आवश्‍यक असल्याने
कार्यकारिणीला हजर राहण्याचे आदेश लाचलुचपत विभागाने देण्यात आले आहेत.

उद्योग पंढरीत अनेक जण कात्रीत
खेड तालुक्‍यात ग्रामपंचायतस्तरावर बांधकामाच्या नोंदी तातडीने घालण्यासाठी चालणारी मोठी आर्थिक उलाढाल खराबवाडीसह नाणेकरवाडी येथील या लाच प्रकरणामुळे समोर आली आहे. चाकण उद्योग पंढरीत अनेक ग्रामपंचायतीमध्ये सर्वात मोठी आर्थिक उलाढाल नोंदीच्या असल्याचे बेकायदा नोंदीच्या शेकडो प्रकरणावरून उघडकीस आले आहे. अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यामुळे थेट कारवाईच्या कात्रीत सापडले आहेत.

खराबवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बाळू बबन मलघेने घेतलेल्या लाचप्रकरणी या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना जबाबदार म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तपास कमी चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत. त्या तपासकामी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज असून, यातून प्रशासनाला योग्य मार्ग काढण्यास निश्‍चित मदत होणार आहे.
– बाळासाहेब ढवळे, सहायक गटविकास अधिकारी, खेड

Leave A Reply

Your email address will not be published.