पुणे – दरवर्षीचा ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी सेव्ह द चिल्ड्रन बाल रक्षा भारत पुणे या सामाजिक संस्थे तर्फे पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये स्तनपान विषयी जनजागृती व्हावी व जनमानसांत स्तनपानाचे महत्व समजावे म्हणून दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला व कारवा रथ चे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी ज्योती शिंदे सभापती वडगाव मावळ पंचायत समिती , सुधीर भागवत गट विकास अधिकारी वडगाव मावळ पंचायत समिती , चंद्रकांत लोहारे तालुका आरोग्य अधिकारी , वडगाव मावळ पंचायत समिती तसेच सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. हा रथ संपूर्ण एक आठवडा म्हणजेच दिनांक २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट मावळ प्रांतातील एकूण ४५ गावांमध्ये जाऊन स्तनपानाचे महत्व, पोषक आहार, आई व बाळाला स्तनपानामुळे होणारे फायदे , लसीकरण इत्यादी विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहे.
सेव्ह द चिल्ड्रेन पुणे हि संस्था बालकांचे शिक्षण, आरोग्य, आहार, आपत्ती इत्यादी समस्या सोडवण्यासाठी काम करते जगभरातील एकूण १२० देशांमध्ये हि संस्था कार्यरत आहे. मावळ प्रांतात संस्थे तर्फे हर्बल लाईफ च्या सहाय्याने “न्यूट्रीशन फॉर झिरो हंगर” नावाचा नवा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. ज्या मध्ये कुपोषण व पोषक आहार या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्तनपान सप्ताह साजरा करणे आणि कारवा रथ जनजागृती साठी मावळ प्रांतात सुरु करणे हा सुद्धा याच प्रकल्पाचा भाग आहे. मुख्यत्वे हा प्रकल्प कुपोषण कमी करणे यासाठी राबवविला जाणारा एक स्तुत्य उपक्रम आहे.