नगरमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक

नगर: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नगर जिल्ह्यात तब्बल 1 लाख 65 हजार 721 तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सर्व उमेदवारांकडून रोजगार निर्मितीच्या मुद्‌द्‌यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे रोजगारासाठी मार्च 2019 अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल 1 लाख 65 हजार 721 तरुणांनी नावनोंदणी केलेली आहे. यात 35 हजार विविध शाखांच्या पदवीधर तरुणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात नियमित नूतनीकरण करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांचा आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्‍यता आहे. आजवर सत्तेत येणाऱ्या प्रत्येक सरकारसमोर देशातील बेरोजगारी सर्वाधिक डोकेदुखी आणि कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकांमध्ये रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असून, रोजगार निर्मितीच्या मुद्‌द्‌यांवर प्रत्येक निवडणुकीत राजकारण होताना प्रकर्षाने दिसून येते.

परंतु, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती होत नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे.
नगरच्या औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढली नसून अस्तित्वात असलेल्या उद्योगांचाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊ शकलेली नसल्याने बेरोजगार तरुणांच्या जिल्ह्यातही बेरोजगार तरुणांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.