बंगळूर – कर्नाटकमध्ये दाखल दक्षिण आफ्रिकेतील दोन नागरिकांना करोनाबाधा झाल्याचे समोर आले. त्यांना करोनाच्या नेमक्या कुठल्या प्रकाराची बाधा झाली ते अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.
दक्षिण आफ्रिकेत करोनाचा ओमिक्रॉन हा नवा अवतार आढळल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अशात कर्नाटकमधून धोक्याची घंटा वाजवणारी बातमी आली. कर्नाटकच्या बंगळूरमध्ये 1 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतून 94 प्रवासी दाखल झाले.
त्यातील दोघांना करोनाबाधा झाली. त्या दोघांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या तपासणीतून अधिक माहिती उपलब्ध होईल.
करोना संकटाच्या दृष्टीने अति धोकादायक ठरवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेसह 10 देशांमधून चालू महिन्यात बंगळूरमध्ये 584 प्रवासी दाखल झाले. आता संबंधित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कर्नाटकमधील विमानतळांवर करोनाविषयक चाचणी केली जाणार आहे. त्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला तरच संबंधित प्रवाशाला विमानतळाबाहेर जाऊ दिले जाणार आहे.