पुणे/बावधन – चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि लक्झरी बस महामार्गावरील लोखंडी सुरक्षा कठडा तोडून सेवा रस्त्यावर (सर्व्हिस रोड) येऊन उलटली. बावधन येथील एम कनेक्ट पार्कसमोर शनिवारी (दि. 18) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 13 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षा कठडा तोडून गाडी सर्व्हिस रस्त्यावर येण्याची बावधन परिसरातील ही दुसरी घटना आहे. महिन्याभरात घडलेल्या या घटनेमुळे खरंच “सुरक्षा कठडे सुरक्षित’ आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. यातील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
परी शर्मा कंपनीची असलेली लक्झरी ट्रॅव्हल्स (केए 51 एजी 1457) रात्री मुंबईहून बंगळुरूच्या दिशेने निघाली होती. रात्री अकराच्या सुमारास बस बावधन येथून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस लोखंडी सुरक्षा कठडा आणि विजेचा खांब तोडून सर्व्हिस रोडवर आली. येथील कठडा उताराचा असल्याने बस उलटली. बस स्लीपर कोच असल्यामुळे सर्व प्रवासी झोपेत होते.
स्थानिक नागरिकांसह हिंजवडी, बावधन पोलिसांनी बसच्या समोरील फुटलेल्या काचेतून प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी मेमाणे, रमेश रणदिवे, जवान किसन तरपाडे, गजानन बालगरे, शशिकांत धनवटे, संकेत घोगरे, सौरभ पारखी घटनास्थळी दाखल झाले.
अपघातानंतर सेवा रस्ता बंद
अपघातामध्ये लक्झरी बस सर्व्हिस रस्त्यावर पडल्यामुळे पोलिसांनी तात्काळ संजय घोडावत मेडिकल ऍकेडमी (रोझवूड बॅन्क्वेट) येथून रस्ता बंद करून मराठा मंदिर येथून चांदणी चौकमार्गे वाहतूक वळविण्यात आली. पोलिसांनी तात्काळ क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्यक बस सरळ करून सर्व्हिस रस्ता तीन तासात वाहतुकीसाठी खुला केला.
नशीब बलवत्तर…
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांना बसच्या छतावर असलेल्या दोन मोठ्या खिडकीतून आणि समोरच्या बाजूने फुटलेल्या काचेतून बाहेर काढले. त्यामध्ये लहान मुलांसह वृध्द व्यक्ती होते. जवानांनी बसमध्ये जाऊन कोणी प्रवासी आत राहिले की नाही याची खात्री केली. त्यावेळी बसमध्ये सिलिंडर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु सिलिंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे प्रवाशांचे नशीब बलवत्तर..अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.
अपघातातील जखमींची नावे
आशिया खान, रेहना खान, बसवराज बी. एच., बसचालक अदिल पाशा, संकेत कदम, जसीन वलीटस, सूरज लाड, ब्रजेशमुकार विश्वकर्मा, अनिल विश्वकर्मा, युनुस सय्यद, ताजबेगम शेख, ताजौद्दीन नवाबजान शेख, जिनद शेख. हे सर्व प्रवासी मुंबई, ठाणे आणि कर्नाटकमधील रहिवासी आहेत.