विनामास्क… दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान

मुख्यसभा गुंडाळणारे सदस्यांकडूनच नियम मोडीत

पुणे – करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मुख्यसभा गुंडाळणारे सदस्यच महापालिकेच्या मुख्य सभागृहात मास्कविना आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे बुधवारी दिसून आले. करोना सुरक्षिततेचे कोणतेही नियम संबंधितांकडून पाळले जात नव्हते, हा प्रकार म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान.., असाच असल्याची चर्चा सुरू होती.

करोना संसर्गात नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र महापालिकेच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे महापालिका मुख्यसभेत पाहायला मिळाले. अनेक नगरसेवक मास्कविना आणि काहीजण मास्क गळ्यात अडकवून फिरत होते आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता शेजारी बसले होते.

तर काहीजण अगदी खांद्यावर हात ठेवत सेल्फी काढण्यात मग्न होते. या कृत्याबद्दल त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे धारिष्ट्य महापालिका प्रशासन दाखवणार का? हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

दसरा आणि दिवाळीनंतर पुन्हा मोठी लाट येणार असल्याचे भाकीत केंद्रीय पथकाने केले आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्याकडून महापालिका आणि पोलीस प्रशासन वारेमाप दंड वसूल करत आहेत. सर्वसामान्यांनाच हे नियम आणि लोकप्रतिनिधींना नाहीत, असे का? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.