मुंबई – 11 मार्च रोजी पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी केली आहे. यावेळी ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे.
गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने हसन मुश्रीफ यांना मोठा झटका बसला असून, आता मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे. यापूर्वी 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते.
दिवसभरात आमदार मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास छापेमारी केली असून, यावेळी त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. या चौकीनंतर मुश्रीफ यांना आज सोमवारी (13 मार्च) ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती.
दरम्यान, ईडीने समन्स बजावले असून ते आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. छापेमारी करण्यात आली त्यानंतर हसन मुश्रीफ नॉटरिचेबल होते आणि थेट आज कागलच्या आपल्या घरी असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने मी तिथे होतो.
आज कागलला कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलो. आज ईडीच्या चौकशीला मी हजर राहू शकणार नाही. माझे वकील ईडीकडून मुदत मागणार आहे. ज्या प्रकरणाचा माझा काही संबंध नाही, त्याचे समन्स ईडीकडून पाठवण्यात आले आहे…” असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.