मुंबई – 11 मार्च रोजी पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी केली आहे. यावेळी ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तब्बल साडे नऊ तास ही छापेमारी करण्यात आली होती.
गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने हसन मुश्रीफ यांना मोठा झटका बसला आहे. यापूर्वी 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. दरम्यान, अश्यातच हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तब्बल 25 शेतकऱ्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुश्रीफ अडचणीत झाले आहेत. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते.
त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले आणि सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि तक्रारींचा तपास कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून करण्यात येणार आहे.