पुणे – महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर पुण्यात दोन महत्वाच्या पोट निवडणूका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्यावर्षी 22 डिसेंबरला निधन झाले होते. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी 3 जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते.
विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आता या निवडणुकांच्या मतदान दिनाची तारीख आयोगाकडून बदलण्यात असून, आता ह्या निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तर, दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेत भाजप कडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता महत्वाची माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणले की, ‘कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी तयार झाली आहे.
ती यादी केंद्रीय समितीकडे आम्ही शुक्रवारी पाठवणार आहोत. केंद्रीय समिती 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी बैठक घेईल. त्यावेळी आमच्या यादीवर विचार केला जाईल. त्यानंतर दिल्लीतून 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल”. असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
कसबा पेठेत घरातूनच उमेदवारी मिळणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान…
भाजपा मुक्ता टिळक यांच्या घरातूनच उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला होता. अश्यातच, एका पत्रकार परिषदेत कसबा पेठ मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजप घरातून उमेदवारी देणार का?
असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, “भाजपा घरातून उमेदवार देत नाही, असं कोण म्हणालं…’ असा प्रति सवाल त्यांनी केला. त्यामुळे घरातून उमेदवार उभा केला जाऊ शकतो’, असे संकेत त्यांनी दिले आहे.