मुंबई – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा परिसरातून कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं आहे. धंगेकर यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी विजयी झाला आहे.
कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता कसब्यात रवींद्र धंगेकर हे किंगमेकर ठरल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, कसब्यातील निकालाबाबत राज्यातील अनेक नेत्यांनी भाजपच्या शहर नेवृत्वार प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे आता शहर भाजपकडून राज्य कार्यकारिणीला अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये भाजपचं शहर नेतृत्व बदलाचे संकेत दिसत आहे.
त्यामुळे तीन वर्ष शहराध्यक्ष असलेल्या जगदीश मुळीक यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यांच्याजागी आमदार सिध्दार्थ शिरोळे किंवा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची नावे नव्या शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.
त्यामुळं येणाऱ्या काळात पुणे शहरातील भाजपचं नेतृत्व दुसऱ्या कुणाच्या तरी हाती जाणार असं दिसून येत आहे. कसब्यातील परभावानंतर भाजपच्या सर्व शहर आणि जिल्हा संघटनांमध्ये तातडीने बदल करण्याच्या हालचालींना वेग आला असून, याचे पडसाद सगळीकडेच पाहायला मिळणार आहे.