नवी दिल्ली – करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण येत आहे. करोनाचं वाढतं संकट पाहता, CBSE च्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. CBSE 12वी च्या परीक्षा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. तर 10वींच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्री आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवारी एक बैठक घेतली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार, 4 मे ते 14 जून पर्यंत होणाऱ्या 12वी च्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. 1 जून रोजी एक आणखी बैठक घेण्यात येईल. त्यावेळची स्थिती बघून पुढला निर्णय घेण्यात येईल. परीक्षा घेण्यात येणार असतील तर 15 दिवस आधीच विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येणार आहे.
दरम्यान CBSE 10वीची परीक्षा 4 मे ते 14 जूनपर्यंत होणार होती. मात्र ही परीक्षा पूर्ण रद्द करण्यात आली आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांच्या परफॉर्मंसच्या आधारावर गुण दिले जातील. कुणी विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर खूश नसतील तर ते नंतर पुन्हा परीक्षा देऊ शकतील. सीबीएससीच्या दोन्ही परीक्षा रद्द करण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली होती.