मुंबई – करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, राज्यात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचललं आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र खासगी रुग्णालयात लसीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, मोफत लसीकरणासाठी २ कोटी डोसेस लागणार आहेत. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लस सरकारी रुग्णालयात मोफत मिळेल पण खासगी रुग्णालयात लसीसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे टोपे यांनी नमूद केलं.
दरम्यान लसीकरणाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी नोंदणी करूनच लस घेण्यासाठी जावं. थेट केंद्रावर गेल्यास लसीकरण होणार नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं असून सर्वांनाच समंजसपणे काम करावं लागणार असल्याचे त्यांनी म्हटलं. मात्र १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण १ मेपासून सुरू होणारं नसल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लसीकरण लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालं आहे.
लसीच्या उपलब्धतेबाबत टोपे म्हणाले की, आपल्याकडे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी आहेत. कोव्हिशिल्डचे १ कोटी डोसेस दर महिन्याला देऊ असं कंपनीने सूचित केलं आहे. मात्र कोव्हॅक्सिनचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरणात रशियाच्या स्फुटनिक V लसीचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.