BJP Leader : उत्तर प्रदेशातील मधील मुरादाबाद जिल्ह्यात भाजपशी संबंधित एका शेतकरी नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपाल सिंह (वय ५५) यांचा मृतदेह बिलारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दांडा गोविंदपूर गावाजवळील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मृत्यूमागे आत्महत्या की घातपात, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपाल सिंह हे मंगळवारी रात्री आपल्या घरासमोरील व्हरांड्यात झोपले होते. मात्र रात्री उशिरा ते अचानक बेपत्ता झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकरी शेताच्या दिशेने गेले असता गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर एका झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. BJP घटनेची माहिती मिळताच बिलारी पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही आत्महत्येची घटना असू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा सरळसरळ खून असल्याचा आरोप केला आहे. मृत नेत्याचे धाकटे बंधू वीरपाल सिंह आणि मुलगा राजेश कुमार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, घटनास्थळाजवळ मृताचा मोबाइल फोन, काठी आणि कपडे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळले. Breaking news त्यांच्या मते, या वस्तूंच्या अवस्थेवरून घटनास्थळी झटापट झाल्याचा स्पष्ट संशय निर्माण होत आहे. “चंद्रपाल सिंह यांची हत्या करून नंतर आत्महत्येचे स्वरूप देण्यासाठी त्यांचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला,” असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री एका ओळखीच्या व्यक्तीने चंद्रपाल सिंह यांना फोन करून घराबाहेर बोलावले होते. त्यानंतर ते पुन्हा घरी परतले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्या मोबाइल फोनच्या कॉल डिटेल रेकॉर्डची (सीडीआर) तपासणी सुरू केली आहे. शेवटचा संपर्क नेमका कोणाशी झाला होता, तसेच रात्री त्यांना कोण भेटले होते, याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे. दरम्यान, फॉरेन्सिक अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सध्या सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला असून संबंधित व्यक्तींची चौकशीही केली जात आहे.