नवी दिल्ली – एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील घरावर दगडफेक झाल्याची घडताना घडली आहे. रविवारी (19 फेब्रुवारी) रात्री उशिरा काही अज्ञात लोकांनी ओवैसी यांच्या घरावर दगडफेक केली असून, या हल्ल्यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असून, सध्या दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील अशोक रोड परिसरात असलेल्या निवासस्थानावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी दगड फेकली केली होती. मात्र, यावेळी ओवैसी आपल्या घरात उपस्थित न्हवते. असं स्वतः असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं आहे.
या घटनेबाबत बोलताना ओवैसी म्हणाले की, ‘मी रात्री 11:30 वाजता माझ्या निवासस्थानी पोहोचलो. परत आल्यावर मला दिसले की, खिडकीच्या काचा तुटलेल्या होत्या आणि आजूबाजूला दगड पडलेले होते. माझ्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली की, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केली आहे. असा हल्ला होण्याची ही चौथी वेळ आहे.’ असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान, सध्या दिल्ली पोलीस या हल्ल्याची चौकशी करत असल्याचं देखील यावेळी सांगितलं आहे.