‘जैश’चा म्होरक्या मसूद अझहर अखेर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला आज संयुक्‍त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत भारताचे संयुक्त राष्ट्र संघाचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली असून ते लिहितात, “छोट्या-मोठ्या अशा सर्वच राष्ट्रांनी एकत्र येऊन आज मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं. सर्वांच्या सहकार्यासाठी धन्यवाद”

दरम्यान, भारतामध्ये करण्यात आलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारत गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील होता मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जात होता.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देखील चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आपल्या नकार अधिकाराचा वापर करत मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यापासून वाचविले होते. मात्र भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर काल चीनतर्फे “संयुक्त राष्ट्रांद्वारे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रश्न योग्य रित्या सोडवला जाईल” असं वक्तव्य करण्यात आलं होतं. चीनच्या कालच्या भूमिकेनंतर आज लगेचच जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला संयुक्‍त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने हा भारताचा मोठा कूटनीतिक विजय असल्याचं मानलं जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.