पुणे – पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांमधील पोट निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात 27 तारखेला या दोन्ही जागांसाठी मतदान होणार होते. मात्र आता निवडणूक आयोगाने कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये बदल केल्याची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर पुण्यात दोन महत्वाच्या पोट निवडणूका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्यावर्षी 22 डिसेंबरला निधन झाले होते. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी 3 जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.मात्र आता या निवडणुकांच्या मतदान दिनाची तारीख आयोगाकडून बदलण्यात आल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी करत आगामी पोट निवडणुकांचा तपशील सर्वांसमोर आणला आहे. यानुसार,चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाटी जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाणार आहे.
त्यानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 7 फेब्रुवारी असेल तर 8 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 10 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी या दोन्हही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. तसेच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2 मार्च रोजी इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील या दोन मतदारसंघांमध्येही मतमोजणी केली जाईल. आयोगाच्या पत्रकानुसार 4 मार्चपूर्वी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
का करण्यात आला बदल
पुण्यात होणाऱ्या या पोट निवडणूका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महत्वाच्या मानल्या जात आहेत. अशात निवडणूक आयोगाने यामध्ये बदल केल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील बाराविच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा या समान कालावधीमध्ये येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयोगाने हा महत्वाचा निर्णय जाहीर केल्याचे समजते.