“लष्करी मोहिमांविषयीची गोपनीय माहिती फोडणे हा देशद्रोह”

नवी दिल्ली – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या वादग्रस्त व्हॉटस्‌ऍप चॅट प्रकरणावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवरील शाब्दिक हल्लाबोल सुरूच ठेवला. लष्करी मोहिमांविषयीची गोपनीय माहिती फोडणे हा देशद्रोह आहे. तशाप्रकारची माहिती उघड करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांनी बुधवारी केली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून धडक कारवाई केली. त्या हवाई हल्ल्याची माहिती अर्णब यांना आधीपासूनच होती, असे त्यांच्या चॅटमधून सूचित होत आहे. त्यावरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारला घेरले. गोपनीय माहिती देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला तुरूंगात जावे लागेल, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

त्यानंतर कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवरील शाब्दिक हल्ला आणखी तीव्र केला. पत्रकार परिषदेला अँटनी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबरच गुलाम नबी आझाद आणि सलमान खुर्शिद उपस्थित होते. 

राष्ट्रीय सुरक्षा, लष्करी मोहिमा आदींशी संबंधित गोपनीय माहिती फोडण्याचे कृत्य देशविरोधी आहे. त्यासाठी कुठली दया दाखवली जाऊ नये. सरकारने तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी अँटनी यांनी केली. पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. अशाप्रकारे राष्ट्रीय सुरक्षेशी कधीच तडजोड झाली नाही.

पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याबरोबरच संपूर्ण सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक, राजकीय आणि घटनात्मक अधिकार राहिला आहे का? संबंधित प्रकरणाने देशाच्या सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणाऱ्यांच्या विश्‍वासार्हतेला मोठा तडा गेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी संशय दूर करण्यासाठी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्या निवेदनातून करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.