हिंगोली : मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील गाडीला हिंगोली जिल्ह्यात अपघात झाल्याचं समोर आलं आहे. नर्सी नामदेव येथे कोश्यारी यांच्या ताफ्यातील अग्निशामक विभागाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने ही गाडी समोरच्या दोन गाड्यांवर धडकली.
या अपघातात राज्यपाल किंवा त्यांच्या इतर वाहनांना काही नुकसान न झाल्याने अनर्थ टळला आहे. मात्र दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता हिंगोली येथे हजेरी लावून जिल्ह्यातील सिंचनासह इतर मुद्यांचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर त्यांनी काही जणांची निवेदनेही स्वीकारली. त्यानंतर ते हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेवकडे रवाना झाले.
नर्सी नामदेव येथे राज्यपाल कोश्यारी यांचा ताफा पोहोचताच अग्निशामक विभागाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. यामुळे हे वाहन पुढील गाड्यांवर धडकले. यात दोन गाड्यांचे नुकसान झाले. यापासून राज्यपाल कोश्यारी यांचे वाहन दूर असल्याने पुढील अनर्थ टळला.