ब्रेकिंग | महाराष्ट्रात 15 दिवसांचा लाॅकडाऊन? मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

मुंबई – राज्यातील करोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लादण्याची आवश्‍यकता असून त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे राज्यात 15 दिवसांचे कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिले. एक बाधितामुळे 25 जणांना संसर्ग होतो. त्यात लहान मुले आणि तरूणांनाही मोठ्या संख्येने बाधा होत असेल. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर करू, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री एकनाथ शिंदे, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार यांचसह प्रविण दरेकर भअजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज ठाकरे उपस्थित होते.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील परिस्थिती आकडेवारीनिशी मांडली. राज्यासमोर असणाऱ्या ऑक्‍सिजन तुटवडा आणि व्हेंटिलेटरच्या समस्येकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी या लॉकडाऊनला विरोध केला तर त्याला पर्याय काय याची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कडक निर्बंधाची आवश्‍यकता आहे. आम्ही आरोग्य सुविधा वाढवत आहोत. मात्र, हा प्रसार रोखण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याला पर्याय नाही. कडक निर्बंध आठ दिवस पाळा त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी गेल्यावेळी जे काही केले, तशा व्यवस्था करता येतील, याचा आम्ही विचार करू, मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवला. लॉकडाऊन ऐवजी त्याला काही पर्याय आहे याचा विचार केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केला. त्यावर थोरात यांनी पंतप्रधानांकडून राज्याला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, असा टोला लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात जर लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर त्यातून पुण्याला सात दिवस सवलत द्यावी असे सुचवले. अमित देशमुख यांनी आरोग्य विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली. राज्यातील जनतेला वाचवायचा असेल तर तातडीने लॉकडाऊन जाहीर करावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.

टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय
उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल. या टास्कफोर्समध्ये आरोग्य विषयक तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यात कोणत्या व्यवसायांवर निर्बंध लावायचे लॉकडाऊनच्या काळात काय बंद असेल काय सुरू असेल याचा निर्णय घेण्यात येईल, त्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.