नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्या लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. मात्र देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या देशभरात दोन लसी देण्यात येत असून आता केंद्र सरकारने तिसऱ्या लसीला परवानगी दिली आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी या औषधनिर्मिती कंपनीत या लसीचं उत्पादन होणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून करोनाविरोधातील लसीकरण सुरू आहे. आता केंद्र सरकारने स्पुटनिक-v या लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येणार आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली.
रशियात विकसित झालेल्या स्पुटनिक-V या लसीला भारतात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर देशाला कोरोनाविरोधात लढण्यासाठी तिसरी लस उपलब्ध झाली आहे. आता या लसीच्या माध्यमातून भारतात लवकरच लसीकरणास सुरुवात होऊ शकते, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
भारतात हैदराबादमधील डॉ. रेड्डी ही औषधनिर्माता कंपनी स्पुटनिक-V या लसीचे उत्पादन घेत असल्याचं ते म्हणाले.