पिंपरी -दीड वर्षापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) दररोज 100 ते 150 बस बंद पडत (ब्रेकडाऊन) होत्या. सध्या हे प्रमाण खूपच अत्यल्प झाले आहे.
दररोज केवळ 12 ते 13 बसच बंद पडत आहेत. नवीन बस खरेदी झाल्याने ब्रेकडाऊनचे प्रमाण घटल्याचे “पीएमपीएमएल’मधील सूत्रांनी सांगितले.
“पीएमपीएमएल’कडील जुन्या 300 बसेस आणि ठेकेदाराकडील जुन्या 300 बसेस यापूर्वी भंगारात (स्क्रॅब) काढण्यात आल्या आहे. तसेच, 12 ते 13 वर्ष जुन्या डिझेलवरील 190 बस भंगारात काढण्याचे नियोजन आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात तीन वर्षांपूर्वी 233 डिझेलच्या नवीन मिडी बस घेण्यात आल्या.
2019 मध्ये 400 नवीन बस दाखल झाल्या. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये भाडेतत्त्वावर 466 सीएनजी बस घेण्यात आल्या. तर, फेब्रुवारी ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 150 इलक्ट्रिक बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल झाल्या. चालू वर्षी जुलै महिन्यात पुण्यदशमच्या 50 मिडी बस घेण्यात आल्या.
पीएमपीएमएलसाठी स्वत:च्या मालकी हक्काच्या आणि भाडेतत्त्वावरील नवीन बस मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने पीएमपीएमएलच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झाले आहे. वर्ष 2020 मध्ये सप्टेंबर, ऑक्टोंबर दरम्यान दररोज 100 ते 150 बस बंद पडत होत्या. सध्या दररोज केवळ 12 ते 13 बसच बंद पडत आहेत.
500 इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने येणार
पीएमपीएमएलकडून भाडेतत्त्वावर टप्प्याटप्प्याने 500 इलक्ट्रिक बसची घेण्यात येणार आहे. या बस दाखल झाल्यानंतर पीएमपीएमएलच्या बससेवेत चांगली सुधारणा होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता विविध नवे मार्ग सुरू करण्यात आले आहे. तसेच, आवश्यकतेनुसार नवीन मार्ग देखील सुरू केले जाणार आहे.