पुणे : शहरातील “नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या रस्त्यांवर पथारी व्यावसायिक तसेच अतिक्रमणे झालेली आहेत. या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती.
या कारवाईत पोलिसांकडून अधिकृत पथारी व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, कारवाईला तूर्तास ब्रेक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
आधी या रस्त्यांवरील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाईल, त्यानंतरच ही कारवाई केली जाईल असे शहर पोलिसांना कळवण्यात येणार आहे.
त्यासाठीचे पत्र लवकरच वाहतूक पोलिसांना पाठवण्यात येणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरात “नो हॉकर्स झोन’ जाहीर केलेल्या 12 रस्त्यांवर अतिक्रमण नियंत्रण विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित कारवाई सुरू केली असून, बेकायदेशीर स्टॉल्स आणि साहित्याची जप्तीही सुरू केली आहे.
अतिक्रमण नियंत्रण विभाग आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. यात स्टॉल, हातगाडी, पथारी, सिलिंडर आणि इतर साहित्य जप्त केले. दरम्यान, अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळीही कारवाई सुरू करण्यात आली होती.
मात्र, कारवाईत पालिकेने परवाना दिलेल्या अधिकृत पथारींवरही कारवाई करण्यात आल्याने पथारी व्यावसायिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. पालिकेने कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही तसेच पुनर्वसनही केले नाही असे असताना, आता पोलीसही कारवाई करत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार संघटनांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांशी झालेल्या बैठकीत केली.