पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रातही वाढीव परीक्षा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पहिल्या सत्राचे वाढीव परीक्षा शुल्कास स्थगिती दिली होती.
पुणे विद्यापीठाने 2020-21 या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. करोना काळात अनेक पालकांची आर्थिक घडी विस्कटली होती. अनेकांची नोकरी गेल्याने, व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ही शैक्षणिक वाढ पुढच्या वर्षापासून करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. पण परीक्षा शुल्काबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आता पहिल्या सत्रासह दुसऱ्या सत्रातील वाढीव परीक्षा शुल्क न घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
दरम्यान, उद्भवलेल्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ अधिकार मंडळाने द्वितीय सत्रातीलही सर्व अभ्यासक्रम परीक्षांचे परीक्षा व अनुषंगिक शुल्कात कुठल्याही प्रकारणावी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्ष 2019-20 याप्रमाणे परीक्षा शुल्क आकारण्यात यावे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक परीक्षा विभागाने प्रसिद्ध केले आहे.