पिंपरी, (प्रतिनिधी) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर केली जाणारी कारवाई तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली आहे.
गणेशोत्सव पार पडल्यानंतर पुन्हा कारवाई सुरु केली जाणार आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांनी सांगितली.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे अधिकारी क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अतिक्रमण पथक तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे रस्त्यावर, फुटपाथवर तसेच सार्वजनिक ठिकाणी पथारीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास अशा अतिक्रमणांवर धडक कारवाई केली जाते.
रस्त्यावर बेकायदेशीर हातगाड्या लावून व्यवसाय करणा-या व्यावसायिकांवर कारवाई केली जाते. तसेच, फुटपाथवर लावलेल्या टप-या हटविण्यात येतात. सार्वजनिक ठिकाणी जोरजबरदस्तीने मांडव घालून थाटलेल्या दुकानांवर कारवाई केली जाते.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर देखील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई करण्यात येते. कोणी वाढीव बांधकाम केले असल्यास ते हटविण्यात येते. परंतु, सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.
सर्वजण उत्साहात गौरी गणपतीचा सन साजरा करत आहेत. गणेशोत्सवात भाविकांच्या आनंदावर विरजन नको म्हणून ही कारवाई तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ही कारवाई पुन्हा जोमाने सुरु केली जाणार आहे, अशी माहिती अधिका-यांनी सांगितली.