नारायणगाव- पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ (ता. जुन्नर) एका बंद बंगल्याचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून यूएसए कंपनीचे 80 हजार रुपये किमतीचे एक रिव्हॉल्वर आणि 20 हजारांची रोख रक्कम असा 1 लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याची घटना घडली आहे.
दशरथ नामदेव खैरे (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. दशरथ नामदेव खैरे हे कुटुंबासह 17 जानेवारीला दुपारी 1 वाजता बाहेरगावी गेले होते. ते 24 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता परतले. यावेळी अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या कंपाऊंडच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बंगल्याच्या मुख्य दरवाजाच्या कुलपाचा कडीकोयंडा तोडून दरवाजा उघडून आत प्रवेश करून एक रिव्हालवर व 20 हजार रुपये चोरून नेले असल्याचे दिसून आले. नारायणगाव पोलिसांनी शनिवारी (दि. 25) गुन्हा दाखल केला आहे. यापुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.