अंदाजपत्रकातील तरतुदींना जिल्हाधिकारी तथा आयुक्तांची स्थगिती
नगर – महापालिकेला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून महापालिका नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम करते. त्या माध्यमातून शहरात स्वच्छता, ड्रेनेज कामे, दिवा बत्ती असी छोटी-मोठी काम करण्यात येतात. मात्र जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी मनपाच्या अंदाज पत्रकातील तरतुदींना स्थगिती दिल्याने अत्यावश्यक सेवा व कामे वगळता अंदाजे 62 कोटींच्या नविन मंजुरींच्या कामांना ब्रेक लागला आहे.
तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी मनपाचा स्वनिधी खर्च करण्यास 100 टक्के परवानगी दिली होती. त्यातील 50 टक्के निधी हा 30 नोव्हेंबर पर्यंत खर्च करण्यात आला. मात्र भालसिंग हे सेवा निवृत्त झाल्याने मनपाचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे येताच त्यांनी अंदाजपत्रकातील तरतुदींना स्थगिती दिली. त्यामुळे पदाधिकारी निधी, नगरसेवक निधी तसेच विकासभार, आदी विविध लेखाशिर्षातील कामे करण्यावर निर्बंध आले आहेत.
तसेच महापालिकेकडे विविध कामांचे 2010 ते 11 पासून आजपर्यंत 225 कोटी थकीत आहेत. तसेच मनपाची वसूली होत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी या निधीला खर्च करण्यास स्थगिती दिली आहे. मात्र तेवढ्या प्रमाणात मालमत्ता कराची वसुली झाली नसल्याने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. नवीन कामांच्या माध्यमातून मनपावर आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
मनपाची वसुली न झाल्याने स्वनिधी थांबविला
महापालिकेचे वार्षिक उत्पन्न साधारण 125 कोटी आहे. त्यामधून अनेक छोटे-मोठे कामे केली जाते. मात्र हे कामे करत असतांना मनपाची कर वसूली होणे गरजेची आहे. ती जर वसूली झाली नाही तर महापालिकेवर कर्जाचा बोजा वाढत जात आहे. त्यामुळे मनपाचा 50 टक्के स्वनिधी खर्च करण्यास मनाई घातली असल्याचे मुख्यलेखाधिकारी प्रवीन मानकर यांनी सांगितले.