ब्रेक द चेन | निर्बंधावर फेरविचार करावा; हॉटेल व्यावसायिकांचा महाराष्ट्र सरकारला आग्रह

मुंबई – महाराष्ट्र सरकारने पंधरा दिवस नागरिकांच्या हालचालीवर हालचालीवर मर्यादा आणल्या आहेत. त्याचबरोबर हॉटेलमध्ये जेवण घेण्यास मनाई केली आहे. याचा हॉटेल उद्योगावर प्रचंड परिणाम होईल. यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्बंधाच्या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे हॉटेल व्यवसायिकांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर हॉटेल चालकांनी काळजी घेऊन सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर ग्राहकांनाही सध्याच्या परिस्थितीमध्ये काळजी घेऊन व्यवहार करण्याची सवय झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा निर्बंध जारी केल्यानंतर त्याचा हॉटेल व्यवसायावर प्रचंड परिणाम होईल असे सांगण्यात आले.

गेल्या वर्षी करोना व्हायरस नवीन होता. त्यामुळे सर्वसमावेशक लॉकडाउन करण्याची गरज होती. त्याला नागरिकांनी, हॉटेल उद्योगाने सहकार्य केले होते. मात्र आता आपण त्यापासून शिकलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये संसर्ग न वाढू देता व्यवहार करण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. अन्यथा अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम संभवतो असे फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने म्हटले आहे.

या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षाच्या परिणामामुळे महाराष्ट्रातील 35 टक्के रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद झाली आहेत. आता पुन्हा निर्बंध लागू केल्यानंतर आणखी 30 टक्के रेस्टॉरंट कायमचे बंद होऊन जातील.

फक्त पार्सल मुळे हॉटेलचा व्यवसाय तग धरू शकत नाही. कमी प्रमाणात का होईना ग्राहकांना हॉटेलमध्ये येऊन जेवण करण्याची परवानगी देण्याची गरज असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गुरुबक्ष सिंग यांनी सांगितले की, आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य माहित आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडणार नाही अशा पद्धतीने आम्ही आमचा व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. याला ग्राहकही चांगला प्रतिसाद देत आहेत असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.