नवी दिल्ली – भारतातून स्वदेशी करोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनच्या घेण्यास ब्राझीलने नकार दिला आहे. ब्राझीलने कोव्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. परंतु, आता ब्राझीलच्या हेल्थ रेग्युलेटरने भारतातून ही लस आयात करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, अमेरिकेनंतर जगातील सर्वात बाधित देश ब्राझीलमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे.
माहितीनुसार, ब्राझीलने भारत बायोटेकची करोना लस तयार करताना योग्य मानकांच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ब्राझील सरकारने म्हंटले कि, औषधांसाठी चांगल्या उत्पादनाच्या पद्धतींचे पालन न केल्यामुळे त्यांनी भारतनिर्मित कोव्हॅक्सिन नाकारले आहे.
यासंबंधी भारत बायोटेक म्हणाले कि, ब्राझीलने सांगितलेल्या गरजांची पूर्तता केली जाईल. गरजा पूर्ण करण्यासाठीच्या वेळेबद्दल ब्राझीलसोबत चर्चा सुरू आहे आणि लवकरच यावर मार्ग काढला जाईल.
दरम्यान, इराण, नेपाळ, मॉरिशस, पराग्वे आणि झिम्बाब्वेसह इतर अनेक देशांनी आपत्कालीन वापरासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.