ब्रेव्हहार्ट वैष्णवी राठी : वैकुंठात युवती देतीय कोव्हिड मृतांना अंतिम निरोप

– श्रीनिवास वारुंजीकर

पुणे – सध्या देशभरासह जगभर कोविड-19 च्या जागतिक महामारीने थैमान घातले आहे. पुणेही त्याला अपवाद नाही. कोविड बाधितांपैकी कोणाची प्राणज्योत केव्हा मालवेल, याची कसलीही शाश्‍वती राहिलेली नाही. अशा स्थितीत मृतांचे अंतिम संस्कार करणे हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. या रोगाची साथच अतिशय विचित्र असल्याने आपल्या घरातील कुणाचे निधन झाले, तरी वैकुंठात जाऊन अंतिम संस्कार करण्याचे धाडस कोणी करत नाही आहे.

अशा सगळ्या नकारात्मक वातावरणात पुण्याच्या नारायण पेठेतील वैष्णवी सत्येव राठी ही प्रत्यक्ष वैकुंठात जाऊन, ज्यांच्या मृतदेहास अग्नि द्यायला कोणी उपलब्ध नसेल, तर स्वत: जाऊन अंतिम निरोप ती देत आहे.

व्यवसायाने इंटीरियर डेकोरेटर असलेली वैष्णवी समस्त युवा पिढीसमोर एक आदर्श म्हणून पुढे येत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, पिझ्झा आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये तरुणाई व्यस्त असताना वैष्णवीने समाजासमोर एक उदाहरण घालून दिले आहे.

दै. प्रभातशी बोलताना वैष्णवी म्हणाली की, मी इंटीरिअयर डेकोरेटर असून सध्या कोव्हिड-19 मुळे सर्व साईट्‌स बंद आहेत. त्यामुळे माझेही वर्क फ्रॉम होम सुरु आहे. अशातच मी पाहिले की, माझे वडील (सत्येन राठी) विविध सामाजिक संस्थांमधून गरजूंना आवश्‍यक ती सर्व मदत करत आहेत. माझी बहिण प्रियमही त्यांना या कामात मदत करत आहे. रोजीरोटी बंद असलेल्या गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट पोहोचवण्यापासून कोव्हिड सेंटरमध्ये लागत असलेली मदत वडील करत आहेत. मलाही त्यामुळे असे वाटले की, आपणही त्यांच्या कामात थोडासा का होईना सहभाग द्यावा.

अशात माझ्या आजीचे कोव्हिडने निधन झाले आणि तिच्या अंतिम संस्कारावेळी मी प्रथम वैकुंठात गेले. गेल्या वर्षीही मी काही संस्थांसमवेत लॉकडाऊनच्या काळात स्वयंसेवक म्हणून काम केले होते. यावर्षीही आपले योगदान काय देता येईल, असा विचार करत असताना मला समजले की, वैकुंठामध्ये कोव्हिडने मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यासाठी कार्यकर्ते हवे आहेत. मग मी या कामासाठी होकार दिला आणि आई-पपांच्या परवानगीने अंतिम संस्कारांना सुरुवातही केली.

वैकुंठामधील वातावरणाविषयी वैष्णवीने सांगितले की, होय, सुरुवातीला हे काम करताना भीती वाटली. तिथले वातावरण एकूणच दु:खी, गंभीर पण अत्यावश्‍यक कार्य अशा स्वरुपाचे होते. शिवाय या कामासाठी आलेल्या अन्य स्वयंसेवकांनी मला धीर दिला आणि काम समजावून सांगितले. त्यामुळे आता मला अजिबात भीती वाटत नाही. मन स्थिर ठेवून मी एखाद्याला अंतिम निरोप देऊ शकते, हा आत्मविश्‍वास मला आला आहे.

 

माझ्या वयाच्या सर्वच तरुणाईला मी सांगेन की, आपणही आपल्या परीने समाजासाठी योगदान देणे गरजेचे आहे. आपणच आहोत्‌, ज्यांची समाजाला आज सर्वाधिक गरज आहे. अशा काळात बाह्य प्रेरणेची वाट न पाहता सेल्फ मोटेव्हेशनने आपण अशा कामात उतरले पाहिजे, हा वैष्णवीचा संदेश बरंच काही सांगून जाणारा आहे, हे नक्की.

वैष्णवीने पेललेली ही जबाबदारी साधीसुधी नाही. पहाडासारखी छाती असलेल्यांचा धीर वैकुंठात जाताच खचत असतो, हा सर्वसामान्य अनुभव आहे. अशा स्थितीत आपल्या रक्ता-नात्याच्या नसलेल्या व्यक्तीसाठी धाडसाने अंतिम निरोपाची सर्व क्रियाकर्मे करणे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

याबाबत बोलाताना वैष्णवीची आई मोनिका राठी म्हणाल्या की, थोडी काय, मुलगी वैकुंठात अंतिम संस्काराला जातीय म्हटल्यावर एक आई म्हणून मला भीती वाटली होतीच. मात्र, ज्या आत्मविश्‍वासाने वैष्णवीने ही जबाबदारी पार पाडली, त्यावरुन आम्हाला असे वाटते की, आम्ही आमच्या मुलींवर केलेले संस्कार या निमित्ताने फळाला आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.