कंपन्यांकडून बाजारपेठेत साठेमारीची चर्चा
– धिरेंद्र गायकवाड
कात्रज – राज्यामध्ये करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या भीतीमुळे शहरांमध्ये सरकारने संचारबंदी घोषित केलेली असताना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या “ब्रॅंडेड’ लिक्विड जंतुनाशकांचा तुटवडा गेल्या वीस दिवसांपासून संपूर्ण शहरांमधील प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. कोणत्याही औषध दुकानांमध्ये “ब्रॅंडेड’ जंतुनाशक उपलब्ध नसताना “लोकल’ कंपन्यांच्या जंतुनाशकांचा मात्र बाजारात सुळसुळाट झाला आहे.
पुणे शहरामध्ये नोंदणीकृत सुमारे आठ हजार औषधांची दुकाने असल्याचे अन्न औषध प्रशासनाकडील आकडेवारीवरून समजते. शिवाय जंतुनाशकांची विक्री किराणा मालाच्या दुकानांतूनही होते. यावरून यातील उलाढालीची कल्पना येऊ शकते.
कात्रज, धनकवडी, पद्मावती, बालाजीनगर, आंबेगाव पठार या परिसरामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे औषधांची दुकाने आहेत. यातील बहुतांशी दुकानांत “ब्रॅंडेड’ जंतुनाशक मिळत नाहीत. कंपन्यांकडे लिक्विड जंतुनाशकांची मागणी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे औषध दुकानदारांकडून सांगण्यात आले. माल अजून ट्रान्स्पोर्टला आहे किंवा उपलब्ध होत नाहीये, अशीही माहिती मिळत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर “ब्रॅंडेड’ जंतुनाशकांच्या जाहिराती विविध वाहिन्यांवर जोरात केल्या जात असताना बाजारपेठेत अशा कंपन्यांचा मालच मिळत नसल्याने या कंपन्यांबाबत ग्राहकांकडून साशंकता निर्माण केली जात आहे. तर, नागरिकांकडूनही अशा जंतुनाशकांनाच मागणी आहे; परंतु “ब्रॅंडेड’ ऐवजी “लोकल’ मालच अधिक प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. “लोकल’ जंतुनाशकाच्या विक्रीत नफा अधिक मिळत असल्याने औषध तसेच अन्य दुकानदार “ब्रॅंडेड’ माल विकत असल्याचे तसेच “ब्रॅंडेड’ जंतुनाशकांची निर्यात अधिक प्रमाणात होत असल्याने स्थानिक बाजारपेठेत याचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे.
करोनाच्या पर्श्वभूमीवर लिक्विड जंतुनाशक गरजेची आहेत; परंतु अशा महत्त्वाच्या वेळी संबंधित कंपन्या आणि व्यापारी साठेमारी करीत असतील तर नागरिकांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर देशहितासाठी हे हानिकारक आहे. ही खूप मोठी गंभीर बाब असून अन्न औषध प्रशासनाने याबाबत कार्यवाही करणे गरजेचे ठरत आहे.
ब्रॅंडेड जंतुनाशक व सॅनिटायझर यांचा तुटवडा आहे. संचारबंदीमध्ये औषध दुकाने बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी सांगितले आहे. असोसिएशनमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना अडचणी कळविणार आहोत, असे पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रामचंद्र गायकवाड यांनी सांगितले.
– रामचंद्र गायकवाड,उपाध्यक्ष, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन
ब्रॅंडेड जंतुनाशक लिक्विड घेण्यासाठी दिवसभरामध्ये जवळजवळ 100च्या आसपास रोज ग्राहक येत आहेत. मात्र, हे जंतुनाशक उपलब्धच होत नसल्याने नाईलाजास्तव इतर कंपनीचे प्रॉडक्ट ठेवावी लागत आहेत. मात्र, अशा जंतुनाशकांना मागणी कमी आहे.
– विकास दिघे,औषध विक्रेते, धनकवडी