मुलामुलींची उंची (भाग २)

उंची वाढविण्यासाठी काही उपाय असतात का? हा प्रश्‍न बुटक्‍या आई-वडिलांचा अगदी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्‍न असतो. त्यांना स्वत:ला आलेल्या मानसिक ताणातून निदान आता आपल्या मुलाला तरी जावे लागू नये, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्यासाठी शक्‍य झाल्यास ते महागडे उपाय करायलाही तयार असतात. अशा मुलांच्या पालकांना योग्य त्या माहितीची, सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. उंची वाढणे शक्‍यच नसेल तर, वस्तुस्थिती म्हणून स्वीकार करण्यास आणि आपले मूल आहे तसे आनंदाने स्वीकारण्यास शिकविले पाहिजे. 

ज्या मुलांच्या घरी वातावरण अस्थिर असते, त्यांची उंची खुंटते. थायरॉइड ग्रंथीचे आजार मुलींमध्ये विशेष करून आढळतात. तिसऱ्या म्हणजेच पौगंडावस्थेत उंची वाढविणारा सर्वात मोठा घटक म्हणजे सेक्‍स हार्मोन्स. वयात आल्यानंतर मुला-मुलींची उंची झपाट्याने वाढते. मुलांपेक्षा मुली दोन वर्षे लवकर वयात येतात. त्यामुळे मुलींची सरासरी उंची लवकर वाढते आणि लवकर थांबते. यामुळे 10-11 वर्षांची मुलगी 12-13 वर्षांपेक्षा तिच्या दादापेक्षा उंच झाल्याचे आपण पाहतो.
मुलींच्या बाबतीत वयात येणाच्या क्रियेचा एक ठराविक क्रम असतो. पाळी सुरू झाली की, वयात येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असा अर्थ होतो. यानंतर उंची फारशी वाढत नाही. मुली जगभर लवकर वयात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मुलींच्या बाबतीत उंचीची वाढ लवकर थांबत आहे. हे लक्षात घेऊन पालकांनी मुलीचा आहार आणि व्यायाम याकडे वयाच्या वाढीच्या काळात, पाळी सुरू होण्यापूर्वीच जास्त लक्ष दिले पाहिजे. अशा वेळा मैदानी खेळ खेळणे, पळणे, टेकडी चढणे, पोहोणे, सायकल चालविणे, दोरीवरच्या उड्या मारणे, अशा प्रकारचे व्यायाम उंची वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.

उंची वाढण्याकरिता लागणारी चांगल्या प्रतीचे प्रथिने, योग्य प्रमाणात ऊर्जा, कॅल्शियम, जीवनसत्त्व “अ’, “ड’, क’, फॉस्फरस, लोह आहारातून मिळणे आवश्‍यक आहे. सर्व तृणधान्ये, डाळी, उसळी, पालेभाज्या, शिरांच्या भाज्या, दूध, दही योग्य प्रमाणात लोणी, तूप, तेल यांचा वापर, पिकलेली ताजी फळे आणि शेंगदाणे यांचा आहारात समावेश आवश्‍यक आहे.
सामिष आहारात मासळी आणि अंड्यातील पांढरा बलक यातून उत्कृष्ट प्रतींचे प्रथिने मिळतात. संतुलित शाकाहार घेणाऱ्या व्यक्‍तीला सामिष आहाराची आवश्‍यकता नाही; पण तो आहार संतुलित असणे आवश्‍यक आहे. यासाठी वरण-भात, मुगाची खिचडी, दाल-रोटी यासारखे तृणधान्ये व डाळी यांचे मिश्रण करून केलेले पदार्थ सेवन करणे गरजेचे असते. नुसते अन्नघटक उपलब्ध असून भागत नाही. या अन्नघटकांच्या पेशी कसा उपयोग करून घेऊ शकतात, हेही महत्त्वाचे असते. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत, आतड्यांचे जुनाट विकार असतील तर वाढ खुरटलेली राहते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनुवंशिकतेत बदल करणे आज तरी आपल्या हातात नाही. पण सकस, संतुलित आहार समजावून घेऊन योग्य वयात तो मुलांना उपलब्ध करून देणे शक्‍य आहे. मुलांबरोबर व्यायाम करून त्यांना व्यायाम करण्याची गोडी लावणे आणि गोडी लागल्यावर नियमित व्यायाम करण्याच्या सवयीत रूपांतर करणे पालकांच्या हातात आहे. थायरॉइड आणि ग्रोथ हार्मोनचे आजार आणि वयात येण्याच्या दोषांचे निदान लवकर झाले तर मुलांची उंची योग्य रीतीने वाढते, याचे भान ठेवावे. मुलांच्या मनात त्याच्या कमी उंचीमुळे न्यूनगंड निर्माण होणार नाही, हे शिक्षकांनी जागरुकतेने पाहिले पाहिजे.

उंचीमुळेच सारे मिळते असे नाही. शेवटी जीवनाची उंची हीच महत्त्वाची! शिवाजी किंवा शास्त्रीजींच्या उंचीची चर्चा होत नाही. शारीरिक उंची वाढली नाही, तर नाराज होऊ नये. व्यक्‍तिमत्त्वाचे इतर पैलू, सदृढ, निरोगी शरीर, जोम, चिकाटी (स्टॅमिना), चपळता आणि शेवटी मनाची आणि मनुष्यत्वाची उंची वाढविण्याचा प्रयत्न अवश्‍य करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)