निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार

कोपरगाव: जोपर्यंत भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या (नरेंद्र मोदी विचार मंच) भावना समजावून घेत नाहीत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली.
कोपरगाव शहर व तालुक्‍यातील नरेंद्र मोदी विचार मंच व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान केलेच पाहिजे, यावर सगळ्यांचेच एकमत आहे. परंतु कोपरगाव शहर व तालुक्‍यातील विकासकामांचे अनेक प्रस्ताव वारंवार देऊन केवळ आमदारांच्या दबावाखाली मंजूर होत नाहीत, याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री, मंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी आजवर कधीच प्रतिसाद दिलेला नाही. 57 कार्यकर्त्यांची नावे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मंजूर झाली. पण आमदारांनी त्या 57 जणांना शासकीय शिक्के-प्रमाणपत्रे मिळू दिली नाहीत. कोपरगाव भाजपचा ताबा स्वार्थी प्रवृतींनी घेतला. भाजपची एकही शाखा स्थापन केली नाही.

तालुक्‍यातील शेती धंदा उद्‌ध्वस्त, पाटपाणी गेले, तालुक्‍यातील रस्त्यांचे वाटोळे झालेले. जनतेने जायचे कुणाकडे? जिल्ह्यातील भाजपाची दुरवस्था कुणामुळे झाली? स्व. सूर्यभान वहाडणे यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही. लोकसभा असो की विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सहभागी न होण्याचा संकल्प सर्वांनी एकमताने केला. स्वतःला जिल्हा भाजपाचे सर्वेसर्वा समजणाऱ्या नेत्यांनी पक्षच विकून टाकला आहे. या टोळीने मान स्वाभिमान कॉंग्रेसी प्रवृतींकडे गहाण टाकला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविणे देशहितासाठी गरजेचे आहे. लोकसभा निवडणूक प्रचार कुणाचा करायचा, याचा अंतिम निर्णय मात्र नंतर जाहीर केला जाणार आहे. भाजप व शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत, याचे भान सर्वच नेत्यांनी ठेवावे. कार्यकर्त्यांच्या भावना जपणार नसाल, तर आमचेही कुणावाचून अडलेले नाही, असेही वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे.

यावेळी सुभाष दवंगे, विनायक गायकवाड, वाल्मीकराव भोकरे, प्रा. सुभाष शिंदे, गणपतराव दवंडे, नामदेव जाधव, सुधाकर गाढवे, श्रीकांत बागूल, प्रमोद पाटील, माधवराव सांगळे, प्रकाश सवाई, संजय कांबळे, नवनाथ जाधव, प्रभाकर वाणी, चेतन खुबानी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.