लोकसभेसह विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार

पाणीटंचाईने संतप्त वेळे ग्रामस्थांचा ठराव
समीर मेंगळे

भुईंज – खंबाटकी घाटाच्या कुशीत असलेले व हॉटेल व्यवसायाने पिढ्यान्‌ पिढ्या सजलेले वेळे ता. वाई हे गाव शेती आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेले आहे. गेल्या महिन्याभरापासून विहिरी आणि पाझर तलाव त्याच बरोबर पूर्व भागातील गुळूब, चांदक, सुरुर, वहागाव, मोहोडेकरवाडी याही गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असून सुद्धा शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्‍नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने जनावरांच्या आणि माणसाच्या पिण्याचा पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळी आहे.

त्याचा निषेध करण्यासाठी वेळे गावच्या ग्रामस्थांनी गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तातडीची ग्रामसभा घेऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना व त्यांच्या प्रचारांना गाव बंदी करून फिरकू न देण्याचा एक मुखी ठराव सर्वांनुमते करण्यात आला. जोपर्यंत शेती पाण्याच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटविण्याचा प्रयत्न होत नाही तो पर्यंत येणाऱ्या सर्व निवडणूक मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ग्रामसभेत वेळे गावचे सरपंच रफिक इनामदार, उपसरपंच संतोष नलावडे, माजी सरपंच, दशरथ पवार, माजी जी प सदस्य शशिकांत पवार, सुरेश पवार, अशोक ननावरे, भुजंग पवार, शिवाजी जाधव यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे सातारा सातारा पुणे या महामार्गावर वेळे, ता. वाई हे गाव वसलेले असून गावासह परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या गावातील नागरिक पिढ्यान्‌ पिढ्या महामार्गाच्या दुतर्फा हॉटेल टाकून व्यवसाय करून आपला प्रपंच चालवतात. शेतीला पिढ्यान्‌ पिढ्या बारमाही पाणी नसल्याने गावातील शेत मजूर व ग्रामस्थांवर उपासमारीसारखे संकट कोसळले आहे. वेळे गावच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा तालुका व जिल्हा स्तरावरील राजकीय नेते, शासकीय अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभांचे ठराव करून कायम स्वरुपी गंभीर बनलेला प्रश्‍न सोडवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. पण एकही राजकीय नेत्याला व शासकीय अधिकाऱ्याला या गंभीर प्रश्‍नकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसल्याने गावो गावच्या नागरिकांची ससेहोलपट होत आहे.

येथील जनावरांच्या दुधावर शेतकऱ्यांचे प्रपंच चालतात तर मुलाच्या दैनंदीन शिक्षणासाठी हा दूध व्यवसाय आधार समजला जातो. लाखो रुपये किमतीची असणारी येथील जनावरे पिण्याच्या पाण्यापासून व चाऱ्या वाचून उपाशी राहत असल्याने ही किंमती जनावरे बागाती क्षेत्रात पाहुण्याकडे स्थलांतरित करण्याची वेळ वेळे ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.