तर लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार

लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थांचा निर्णय ः पाडव्यानिमित्त ग्रामसभेचे आयोजन

श्रीगोंदा – लोकसभा निवडणुकीअगोदर कुकडीचे पाणी फळबागांना उपलब्ध न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय लोणी व्यंकनाथच्या ग्रामस्थांनी घेतला. पाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या सभेत ग्रामस्थांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. कुकडीचे पाणी आता चांगलेच तापले असून, कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. असे असले तरी धरणात आवश्‍यक पाणी उपलब्ध नसल्याने फळबागांना पाणी मिळणे अवघड आहे. आज लोणी व्यंकनाथ येथे दरवर्षीप्रमाणे पाडव्याची बैठक संपन्न झाली.

शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी पाण्याची भीषणता आणि कुकडीचे वास्तव सांगत पाण्याच्या बाबतीत श्रीगोंदा तालुक्‍यावर कशा पद्धतीने अन्याय केला जातो याबाबत भूमिका विशद केली. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आपल्या भागातील फळबागांना पाणी न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची सूचना केली. या सूचनेला उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावत पाठिंबा दर्शविला. कुकडीचे फळबागांना पाणी न मिळाल्यास लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय झाला.

तालुक्‍यात दुष्काळी स्थिती असल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरे, पिके व फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे. त्यासाठी निवेदने, नेत्यांना साकडेही घालण्यात आले आहे. जर पाणी सुटले नाही, तर शेतकऱ्यांच्या फळबागा हातच्या जातील, त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पोटतिडकीने आपल्या भावना यावेळी मांडल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.