अकोला – शहरातून धक्कादायक बातमी समोल आली आहे. शहरातील शास्त्रीनगर परिसरात वर्गमित्रानेच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रतीक लवंगे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अकोला पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्यास अटक केली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
आरोपी आणि मृत दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. अकोल्यातील शास्त्रीनगर भागात भाड्याने खोली घेऊन ते एकत्र राहत होते. ते दोघेही ‘नीट’ परीक्षेची तयारी करण्यासाठी अकोल्यात शिकवणी वर्गासाठी राहत होते.
या घटनेतील आरोपी विद्यार्थी आणि मृतक प्रतीक लवंगे या बालपणापासून एकमेकांचे जीवलग मित्र होते. आधीपासून एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती. त्यामुळेच दहावीनंतर ‘नीट’ परीक्षेच्या अभ्यासासाठी दोघांनीही अकोल्यात प्रवेश घेतला. ते दोघेही एकाच शिकवणी वर्गात शिकत होते. अकोल्यातील शास्त्रीनगर भागात एका घरी त्यांनी भाड्याने खोली घेतली होती. दोघेही अतिशय घनिष्ठ मित्र असल्याने घरचेही अगदी निष्काळजी होते. मात्र, या घटनेने दोघांचेही कुटुंबीय पार हादरुन गेले आहेत.
प्रतीक लवंगेच्या जीवलग मित्राने त्याची हत्या का केली असावी? याचा अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस तपास करत आहेत. 17 जून रोजी रात्री कुठल्या तरी कारणावरुन या दोघांचा आपसात वाद झाला. या वादातच प्रतीक लवंगे याची त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने घरमालकाला आपला मित्र बेशुद्ध झाल्याचे सांगितले. घरमालकाने तोपर्यंत पोलिसांनाही याची सूचना दिली होती.
प्रतीकला दवाखान्यात भरती करताना त्याचा आरोपी मित्रही सोबत होता. दवाखान्यात डॉक्टरांनी प्रतीकला मृत घोषित केले. यावेळी पोलिसांना त्याच्या अंगावर काही संशयास्पद खुणा दिसल्याने त्यांचा संशय होताच. त्यांनी याप्रकरणी आरोपीवर पाळत ठेवत त्याची चौकशीही केली होती. काल याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला. त्यात प्रतीकचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
यावरुन काल पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, आपल्याच जीवलग मित्राची हत्या आरोपीने का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. अभ्यासातील एका मुद्द्यावरुन दोघांत वाद झाले अन् यातूनच वाद विकोपाला जाऊन ही हत्या घडली असावी, असा एक प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, आणखी तपासानंतर यातील खरं सत्य बाहेर येईल. अकोला पोलिस पुढिल तपास करीत आहेत.