लखनौ – अभ्यासासाठी वडिलांनी टोकल्याचा राग आल्यामुळे मुलाने वडिलांवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना लखनौ मधील चिनहट पोलिस क्षेत्रात असलेल्या मटियारी मध्ये घडली आहे.
अखिलेश यादव असे वडिलांचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहे. गोळीबारानंतर त्यांना लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ट्रामा सेंटरमध्ये हलविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
मटियारी मधील विहार कॉलनीमध्ये अखिलेश यादव त्यांच्या कुटुंबीयसोबत वास्वव्यास आहेत. रविवारी सकाळी त्यांचा मुलगा अमन जवळ असलेल्या एका दुकानात बसला होता. यावेळी मॉर्निंग वॉकवरुन येत असताना अखिलेश यांनी मुलाला दुकानावर बसल्याचे बघून त्याला फटकारले व घरी जाऊन अभ्यास कर असे सांगितले. याचा मुलाला राग आला.
त्यानंतर मुलगा घरात गेला आणि वडिलांची बंदूक घेत त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात वडील अखिलेश गंभीर जखमी झाले. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.