खडकवासला – किल्ले सिंहगडावर हवेली तालुक्यातील मोशी येथून सहलीसाठी आलेला 18 वर्षीय विद्यार्थ्याचा हत्ती टाक्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 18) दुपारी बाराच्या सुमारास घडली. शाहिद मुल्ला (वय 18, रा. मोशी ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गडावरील स्थानिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत संबंधित विद्यार्थ्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे.
मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलचे इयत्ता बारावीचे साठ विद्यार्थी व चार शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते. हत्ती टाकी परिसरात असताना शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरला व तो थेट पाण्यामध्ये पडला.
स्थानिक रहिवाशी आणि घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर, विठ्ठल पढेर, आकाश बांदल, विकास जोरकर, सुरेश शिवतरे यांनी पोहता येत असल्याने तात्काळ पाण्यामध्ये उतरून शाहिदचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अखेर प्रयत्नांची पराकाष्टा करत स्थानिकांनी शाहिद यास पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान सिंहगडावर पर्यटन करणाऱ्या एका युवकाने त्या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु तो बेशुद्धच असल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले सिंहगडावर जोरदार पाऊस सुरू असल्याने हत्तीटाके पूर्ण भरलेले आहे. त्यामुळे शाहिदचा शोध लागण्यास उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.