वीर येथे दोन दिवसांनी मृतदेह सापडला
परिंचे – वीर (ता.पुरंदर) येथे अभिषेक रामप्रसाद हिंगे (वय 19, रा. चिखलठाणा, जि.परभणी) या तरुणाचा ओढ्यातील डोहात बुडून मृत्यू झाला. मुळशी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसाच्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले.
वीर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्त किर्तनात पखवाज वादक म्हणून अभिषेक हिंगे व त्याचा साथीदार गजानन भरत धनकुरे (वय 18, सायगाव, जि.जालना) आले होते. बुधवारी (दि.30) सकाळी आठ वाजता हे दोघे मंदिरा समोरील ओढ्याच्या काठावर तोंड धुण्यासाठी गेले. तोंड धुताना अभिषेकचा तोल जाऊन पाण्यात पडला त्याने शेजारी उभा असलेल्या गजानन याला ही पाण्यात ओढले. दोघेही पाण्याच्या प्रवाहात वीरेश्वर डोहात वाहून गेले. गजानन पोहून बाहेर पडला, अभिषेकला पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
वीर गावातील स्थानिक तरुणांनी अभिषेकचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न करून अभिषेकचा मृतदेह सापडला नाही. सदर घटनेची खबर गावचे सरपंच माऊली वचकल यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये दिली. सासवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्यासह पोलीस हवालदार कुंडलिक माने, अनिल खोमणे, दत्तात्रय जाधव, अविनाश निगडे, श्रीकांत भंडलकर या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.
मृतदेह सापडत नसल्याचे समजताच मुळशी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले. बुधवारी दुपारी दोन वाजता शोध मोहीम सुरू झाली होती. आज, दुपारी एक वाजता मृतदेह सापडला. आकरा कार्यकर्त्यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतल्याचे समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी सांगितले.