यंत्रपेटी : अबाऊट टर्न

– हिमांशू

कुणाचं काय तर कुणाचं काय… ईव्हीएमला फुटले पाय! हे इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन आल्यापासूनच वादात आहे. जे सत्तेवर येतात ते म्हणतात, ईव्हीएम चांगलं. जे निवडणूक हरतात ते म्हणतात, ईव्हीएम तत्काळ बंद करा! ईव्हीएम हॅक करता येतं की नाही, यावर मध्यंतरी मोठं विचारमंथन (म्हणजेच वाद) झालं होतं. कुणी-कुणी ईव्हीएम हॅक केल्याचा दावाही केला होता. दहा मतं ईव्हीएममध्ये बंदिस्त करायची आणि नंतर निकाल कसा बदलतो, हे दाखवून द्यायचं, असे अनेक व्हिडिओ तयार केले जातात. सोशल मीडिया तर अशा व्हिडिओंनी नेहमी ओसंडून वाहत असतो.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या देशांमध्येही ईव्हीएम वापरले जात नाही, याकडे लक्ष वेधणारे पावलोपावली भेटतात. हे मशीन खरोखर सुरक्षित आहे की नाही, याची तपशिलासह खरीखुरी माहिती कोणत्या स्रोतामधून मिळवायची, हे सामान्य मतदाराला मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. हे कमी म्हणून की काय, आता ईव्हीएमलाच पाय फुटू लागले.

पूर्वी म्हणजे कागदी मतपत्रिका असताना मतदान केंद्रे ताब्यात घेणे, मतपेट्या पळवणे असे प्रकार घडायचे. ते ईव्हीएममुळे टळले, अशा शब्दांत ईव्हीएमचे समर्थक नेहमी बाजू मांडतात. परंतु उमेदवारांच्या गाडीत आणि घरात ईव्हीएम सापडू लागल्यावर मात्र “पेटी गेली आणि यंत्र आलं,’ एवढाच फरक या दोन्ही मतदान प्रक्रियांमध्ये उरल्याचे दिसतंय.

चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आसाम आणि पश्‍चिम बंगाल ही दोनच राज्ये सध्या चर्चेत! बाकी राज्यांमध्ये निवडणूक आहे की नाही, असाच प्रश्‍न! असो, पण या दोन राज्यांना चर्चेत राहायचे असेल तरी चांगल्या बाबींनी राहायला हवं की नाही? दोन्ही ठिकाणी ईव्हीएमचा प्रॉब्लेम! आसामात निवडणूक आयोगाची गाडीच नादुरुस्त झाली. मग अधिकाऱ्यांनी रस्त्यावरून येत असलेल्या एका गाडीला हात केला आणि आपल्या गाडीतली ईव्हीएम त्या गाडीतून पुढे नेली. नेमकी तीच गाडी उमेदवाराची निघाली.

एकापाठोपाठ एक इतके योगायोग केवळ मनमोहन देसाई यांच्या चित्रपटांमध्येच दिसायचे. आसाम अशा प्रकारे गाजल्यावर बंगाल मागे कसा राहील? तिथं तर एका उमेदवाराच्या घरातच ईव्हीएम सापडली. या घटनेपेक्षाही त्याबद्दल अधिकाऱ्यांनी दिलेलं स्पष्टीकरण अधिक धक्‍कादायक आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही यंत्रं “अतिरिक्‍त’ होती. म्हणजेच मतदानासाठी वापरण्यात येणारी नव्हती. एखादं मतदानयंत्र बिघडलं तर अशी अतिरिक्‍त यंत्रं ठेवलेली असतातच. परंतु ज्या अधिकाऱ्याला ही यंत्रं घेऊन मतदारसंघात धाडलं होतं, तो अधिकारी आपल्या नातेवाईकांकडे झोपायला गेला आणि म्हणून असा गोंधळ झाला म्हणे! संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाल्यामुळे त्याची झोप आता कायमची उडेल.

परंतु एक गोष्ट मात्र समजली नाही. अधिकाऱ्याचा नातेवाईक (ज्याच्या घरी तो झोपला) उमेदवार होता की त्या नातेवाईकाच्या घरून उमेदवार यंत्रं घेऊन गेला? असो, काही प्रश्‍नांची उत्तरं अखेरपर्यंत मिळत नाहीत आणि हळूहळू याही कहाण्यांची सवय होऊन जाईल. मतमोजणीला कमी वेळ लागतो म्हणून ईव्हीएम वापरतात असं म्हणावं तर अनेक ठिकाणी निकाल दुसऱ्या दिवसापर्यंत रेंगाळतात. एकंदरीत अन्य यंत्रांप्रमाणंच मतदान यंत्रांच्या बाबतीतसुद्धा “क्रेझ जास्त, विश्‍वास कमी’ अशी स्थिती होतेय का?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.