बांगलादेशच्या सीमेवर कफ सिरपच्या बाटल्या पकडल्या

माल्दा, (पश्‍चिम बंगाल)- फेन्सेडाईल या कफ सिरपच्या 194 बाटल्या पश्‍चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यात भारत-बांगलादेशच्या सीमेवर आज पकडण्यात आल्या. याप्रकरणी एका व्यक्‍तीला अटक करण्यात आली आहे, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्‍त्याने शनिवारी सांगितले.

शुक्रवारी रात्री सीमा भागात गस्त घालत असताना “बीएसएफ’च्या जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेजवळ काही हालचाल दिसून आली. हे तस्कर असल्याच्या संशयावरून “बीएसएफ’च्या जवानांनी या संशयितांना हटकले. त्यावेळी तीक्ष्ण हत्यारे घेतलेल्या 8-10 जणांनी “बीएसएफ’च्या जवानांना घेरले, असे “बीएसएफ’च्या दक्षिण बेंगाल फ्रंटियरचे प्रवक्‍ते राबी रंजन यांनी सांगितले.

प्रसंगावधान राखून “बीएसएफ’च्या जवानांनी हवेत गोळीबार केला. त्याबरोबर हे तस्कर त्यांच्या जवळील माल टाकून देऊन घटनास्थळावरून पळून गेले. तस्करांनी सोडून दिलेल्या मालामध्ये फेन्सेडिल या कफ सिरपच्या 194 बाटल्या होत्या. “बीएसएफ’च्या जवानांनी या तस्करांपैकी एकाला पकडले आणि जप्त केलेला माल शनिवारी पोलिसांच्या स्वाधीन केला, असेही रंजन यांनी सांगितले.

फेन्सेडिल हे एक कोडीन-आधारित कफ सिरप बांगलादेशात मादक पदार्थ म्हणून वापरले जाते. इशान्येकडील काही राज्यांमध्ये मद्यपानावर बंदी असल्याने तेथेही हे कफ सिरप मादक पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.